वेध माझा ऑनलाईन - अंधेरी पोटनिवडणूक जशी जवळ येत आहे, तसं राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. शिंदे आणि ठाकरे गटात झालेल्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. या पोटनिवडणुकीआधी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळं चिन्ह आणि नाव दिलं. यानंतर आता या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.उद्धव ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. ऋतुजा लटके या शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची असेल तर राजीनामा द्यावा लागतो. लटके यांनी सप्टेंबर महिन्यात हा राजीनामा दिला, पण त्यांचा हा राजीनामा स्वीकारला गेला नाही.ऋतुजा लटके यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये अटी असल्यामुळे हा राजीनामा महापालिकेकडून स्वीकारण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत पराजित झाले तर पुन्हा बीएमसीच्या सेवेत घ्या, अशी अट या राजीनामा पत्रामध्ये टाकण्यात आली होती. यानंतर ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबरला पुन्हा एकदा राजीनाम्याचा नवा अर्ज सादर केला.
ऋतुजा लटके यांनी 2 सप्टेंबरला दिलेल्या राजीनाम्यामध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत माझ्या पदाचा राजीनामा देण्याची अट शिथील करण्यात यावी, अशी मागणी ऋतुजा लटके यांनी त्यांच्या पहिल्या राजीनामा पत्रात केली.
यानंतर 3 ऑक्टोबरला ऋतुजा लटके यांनी नव्याने त्यांचा राजीनामा सादर केला. यात त्यांनी महिन्याचा नोटीस पिरेड द्यायची अट शिथील करण्यात यावी आणि नियमानुसार महिन्याचा पगार घेण्यात यावा, अशी मागणी केली.
दरम्यान राजीनामा स्वीकारला न गेल्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऋतुजा लटके यांच्या या याचिकेवर उद्या 11 वाजता सुनावणी होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख शुक्रवार 14 ऑक्टोबर आहे.
आयुक्तांचं स्पष्टीकरण
दरम्यान या सगळ्या वादावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळलेला नाही. नियमानुसार मी 30 दिवसांमध्ये राजीनाम्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर 2022 राजीनामा दिला. सरकारकडून दबाव असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं इक्बाल सिंग चहल म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment