वेध माझा ऑनलाइन - दिवाळी जवळ आल्यामुळे खरेदीसाठी बाजरपेठात लोकांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना विषाणूच्या तीन नव्या व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेतच. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे 18 नवे रग्ण आढळले आहेत. तर बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. नव्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव आणखी होण्याची शक्यता आहे. जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरून न जाता कोरोना संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तीन नव्या व्हेरियंटचे 20 रुग्ण आढळले आहेत. इन्साकॉग प्रयोगशाळांच्या ताज्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे एकूण 18 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 13 रुग्ण हे पुण्यातील आहेत. नागपूर आणि ठाणे येथील प्रत्येकी दोन तर अकोला येथील एक रुग्ण आहे. या शिवाय पुण्यातच बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांची साथरोग शास्त्रीय माहिती घेण्यात येत असून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे सर्व रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत. या 20 पैकी 15 जणांनी लसीकरण घेतलेले असून पाच जणांची माहिती अप्राप्त आहे. पुण्यातील बीक्यू.1 रुग्ण सौम्य स्वरूपाचा असून त्याचा अमेरिका प्रवासाचा इतिहास आहे. जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरून न जाता कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
No comments:
Post a Comment