Wednesday, October 26, 2022

आनंदाच्या शिध्यातून कधी तेल तर कधी साखर गायब ; पैसे मात्र पूर्ण घेतले जात आहेत ; अनेकांचा तक्रारीचा सूर;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात गरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने आनंदाचा शिधा वाटप सुरू केली आहे. मात्र हा आनंदाचा शिधा सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी वादात सापडला आहे. राज्यात काही ठिकाणी आनंदाच्या शिध्यातून तेल गायब झाल्याचं समोर आलं होतं. आता आनंदाच्या शिध्यामधून साखरच गायब झाली आहे. शिवाय आनंदाचा शिधा वाटप करताना लाभार्थ्यांकडून मात्र पैसे पूर्ण घेण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी हा शिधा पोहोचलेलाच नसून यामुळे अनेकांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. तुळशी विवाहापर्यंत दिवाळी असते तोपर्यंत हा शिधा पोहोचेल असं अजब वक्तव्य आज मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच केले आहे
आनंदाचा शिधा घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून पूर्ण पैसे घेतले जात आहेत. मात्र चार वस्तूंपैकी फक्त तीनच वस्तू काही ठिकाणी लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत त्यात कधी तेल तर कधी साखर  लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे
आधीच कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहे. अशात सरकारने घोषणा केलेल्या 'आनंदाचा शिधा' वाटपाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र 'आनंदाचा शिध्या'तून कधी तेल तर कधी साखर गायब होत असल्यानं नागरिकांना अतिरिक्त पैशांचा भुर्दंड लागत आहे.

No comments:

Post a Comment